Summary of the Book
झिपर्या हा मुंबईत बूटपॉलिश करणारा बारा-तेरा वर्षांचा पोरगा. त्याच्या मनात राग आहे, पण अकारण द्वेष नाही. त्याची बहीण लीला तारुण्यसुलभ आकर्षणांनी क्षणकाल भुरळून जात असली तरी चंचल व थिल्लर नाही. पिंगळ्या हा पोट भरणारा दादा आहे, पण तो काही मनाने दुष्ट नाही. शिवाय झिपर्याची माय, तिची शेजारीण सकीना आणि झिपर्याचे बूटपॉलिशवाले मित्र- या प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. हे सारे दारिद्य्राशी मोठ्या ईर्षेने झगडताहेत. आणि रोज रात्री खाण्याची भ्रांत पडत असतानाही उद्याचा दिवस चांगला असेल या आशेने निद्रेच्या अधीन होताहेत.
आपल्या कौशल्याच्या व नेतृत्वगुणाच्या आधारावर तसेच नार्याच्या ताकदवान पाठिंब्याच्या जोरावर झिपर्या एक मोठा दादा बनण्याची शक्यता होती. पण त्याने वेगळा आणि अधिक कठीण मार्ग पत्करला आहे. त्याच्या किशोर मनावरील इष्ट मूल्यांचा पगडा एवढा चांगला आहे की झिपर्या याच खडतर मार्गाने जाऊ शकणार आहे. असलम, त्याची आई, रेल्वेचा फलाट आणि फार फार तर कीर्तनेमास्तर यांनी या सकारात्मक अथवा रचनात्मक जाणिवा झिपर्याला दिल्या आहेत. आणि म्हणून त्याचे भविष्य कष्टाचे, खडतर आणि संकटांनी भरलेले असले तरी त्याला एका भव्य युद्धाचे स्वरूप आहे....