Summary of the Book
भारतीय महासंगणकाचे जनक, संगणकमहर्षी डॉ. विजय भटकर यांनी संशोधन करताना अध्यात्मलाही शास्त्रच मानले व त्यावरही खूप संशोधन केले आहे. ‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा ग्रंथ आहे. श्री ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे संस्कृतप्रचुर गूढ तत्त्वज्ञान ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाद्वारे बोलीभाषेत देऊन जनसामान्यांना मोक्षाचा मार्ग खुला केला होता. परंतु आजच्या संगणकयुगात इंग्लिश ही जगाची मुख्य भाषा होत आहे व मराठीचे शिक्षण केवळ नावापुरतेच उरले आहे. अशावेळी ज्ञानेश्वरकालीन मराठी समजणे दुरापास्त झाले आहे. ज्ञानेश्वरी सुलभ करण्याचा, ओवीबद्ध ज्ञानेश्वरीचा प्रयत्न आतापर्यंत अनेकांनी केला आहे. परंतु हे लेखक संस्कृत व मराठीचे गाढे पंडित असल्यामुळे त्यांचे ग्रंथ सामान्यांची आध्यात्मिक भूक भागवू शकले नाहीत. संस्कृतप्रचुर अवघड मराठी शब्दांचा वापर व अनुप्रासाचा आग्रह यामुळे ते मूळ ओवीच्या सुलभ भावार्थापासून एका अर्थी दूर गेले.
अशावेळी एक सामान्य वाचक पुढे आला. तीन वेळा ज्ञानेश्वरी वाचूनही समाधान न झाल्यामुळे प्रथम स्वतलाच कळावे यासाठी त्याने अभ्यास सुरू केला. माऊलींच्या ओवीतील त्यांना अभिप्रेत असलेला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, त्यातला अर्थ आणि भावार्थ कायम राहिला पाहिजे, तसेच हा अर्थ सर्वसामान्यांना आणि आजच्या संगणकयुगातील मातृभाषा मराठी, परंतु पहिल्या वर्गापासून इंग्लिश माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांलाही तो कळावा, या हेतूने अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून त्यांनी ‘आजची ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ साकारला आहे.